Tuesday, October 9, 2018

बेरोजगार_unemployed vs #रोजगार_employed

काही दिवसापूर्वी एक जोक वाचण्यात आला , -
#बेरोजगार" या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलप्रमाणे ;
.
.
.
.
" आमचा युवा नेता , युवकांचे आधारस्थान , युवकांचे भाई , युवकांच काळीज , युवा लीडर , युवा डॉन ,
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ,गावची युवा तोफ , भावी सरपंच , भावी नगरसेवक , भावी आमदार , खंबीर नेतृत्व ..." 😁😁🤣
हसण्यासाठी जोक नक्कीच चांगला आहे . पण यातलं गांभीर्य ओळखलं तर खूपच विदारक परिस्थिती आहे ही.
"#बेरोजगार" या शब्दातच अतिशय भयानक विदारकता लपलेली आहे . याच गांभीर्य ओळखायला वरील नेतेमंडळीला वेळ लागतोय , आणि त्यातच त्यांचा वापर करून घेणाऱ्या राजकारण्यांचा डाव साधला जातोय .
आज बऱ्याच ठिकाणी नौकरी मेळावे किंवा रोजगार मेळावे भरवले जातात . ( अर्थातच , राजकीय फायद्यासाठीच ) . पण अश्या मेळाव्यांना खेडोपाड्यातून आपल्या लेकरांना उन्हातान्हात घेऊन येणारे पालक पहिले तर , ह्या "#बेरोजगार" शब्दाची विदारकता समजते .
काही दिवसापूर्वी माझा एक मित्र कुठल्यातरी नौकरीच्या परिक्षेनिमित्त मुंबईला गेला होता . रिक्त पदे जेमतेम १५०-२०० होती . परीक्षेसाठी फॉर्म भरलेल्या "#बेरोजगार" विद्यार्थ्यांची संख्या ही जवळपास २०००० एव्हडी होती . माझ्या मित्राचा फॉर्म न. १७५०० च्या पुढे होता .
तो मित्र मला बोलला कि ; ' काही विद्यार्थी हे नागालँड , मणिपूर या राज्यातून आलेले '.
केव्हडी ही #बेरोजगारी आणि कुठपर्यंत ह्याची झळ पोचलीय याचा अंदाज लावण्याचा मी प्रयत्न केला , फेल झालो अंदाज लावण्यात .
ह्या बेरोजगारीमुळे तरुणाईची मानसिकता नक्कीच बदलत आहे . रोजगार उपलब्ध करून देणे , नौकऱ्याची उपलब्धता करून देणे हे राज्यकारण्यांचं काम आहे . पण हेच राजकारणी गिधाडं ह्या तरुणांना - " ह्याचा अध्यक्ष , ह्याचा उपाध्यक्ष , ह्याचा सदस्य , इथला नेता , इकडचा प्रमुख , तिकडचा नेता " असली उपाधी देऊन नादाला लावतात . पर्यायाने त्यांची कामे करवून घेतात .
त्यांची गरज संपल्यानंतर हेच राजकारणी मंडळी , ह्याच " अध्यक्ष , उपाध्यक्ष , सदस्य , नेते " ह्यांना अलगद बाजूला करतात .
ह्याची असंख्य उदाहरणे आहेत , तरीपण आजकालच्या तरुणांना ह्याच भान नाहीये .
का आणि कशामुळे ह्यांच्या मागे फिरायचं ? का आणि कशामुळे ह्यांचा उदो उदो करायचा ? का आणि कशामुळे एव्हडं लाचार व्हायचं ?
तरुणाईचा जेव्हडा वेळ ह्या राज्यकारण्यांची लाळ पुसण्यात जातो , तेव्हडाच मौल्यवान वेळ जर स्वतःच्या आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी तरतूद करण्यासाठी खर्च केला तर नक्कीच फायदा होईल .
ह्या राजकारण्यांचा खेळ आणि तमाशा फक्त निवडणूक डोक्यात घेऊन केलेला असतो .ह्यांच्या हातातील बाहुल्या बनून राहण्यापेक्षा " वेळ पडलीच तर बूट पॉलिश करून स्वाभिमानाने २ पैसे कमावलेले कधीही चांगलं ".
सांगण्याचा उद्देश एवढाच आहे माझा , कि - तरुणाईने " रोजगार , नौकरी , उद्योग धंदा ' ह्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे .
आज जग खूप म्हणजे खूप फास्ट गतीने पुढे जात आहे , त्या जगाच्या गतीला मॅच होण्यासाठी सर्वानी धडपड करावी . बाहेरच्या जगात जगणासाठीची स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढतच आहे . आज ह्या स्पर्धेत टिकण्यासाठी चालण्याची नाही तर धावण्याची गरज आहे . त्यासाठी जेवढ लवकर प्रयत्न चालू कराल तेव्हड चांगलं .
एक लक्षात असू द्या " मित्रांनो / मैत्रिणींनो " आयुष्यात सगळ्या गोष्टी कदाचित परत मिळू शकतील पण " गेलेला वेळ " कधीच परत मिळणार नाही .
आजच्या आयुष्यात सर्वात महत्वाचं काही आहे तर " वेळ " . म्हणूनच तो " मौल्यवान वेळ " ह्या नेतेमंडळींच्या मागे मागे फिरण्यात वाया घालवू नका .
वेळेचा सदुपयोग करा . " #बेरोजगार " या टॅग मधून मुक्त होऊन " नौकरदार , उद्योजक , स्वावलंबी " ह्या टॅग खाली येण्यासाठी " वेळ खर्च करा " 
_/\_

rups.515@gmail.com

#खड्ड्यात_गेले_पक्ष , #स्वतःकडे_द्या_लक्ष

सगळ्याच पक्षात गेलेल्या तरुणांनो ... !!
कोणी बोलला की , लगेच गेला टोलनाका अड्वायला
कोणी बोलला की , चालला मराठी म्हणून बस फोडायला
कोणी बोलला की , लागला पुरंदरेला शिव्या द्यायला
कोणी बोलला की , चालला गो माता गो माता करायला
कोणी बोलला की , लागला रस्त्यांवर पळायला
कोणी बोलला की , लागला दुसऱ्या धर्माविरुद्ध आग ओकायला ... 😡
ह्यांची मुले स्टडी रूममध्ये
तुम्ही कस्टडी रूममध्ये
ह्यांची मुले अमेरीका युरोपात
तु दहीहंडीच्या कळपात
ह्यांची मुले उच्चपदस्थ
तू एका क्वॉर्टर एवढा स्वस्त
त्यांची मुले इंजिनियर
तू पितो किंगफिशर बीअर
त्यांच्या मुलांना पाचआकडी पगार
तु हंगामी बेरोजगार
तुम्ही मेलात तरी कोणाला फरक पडत नाहीत.
योग्य वेळीच जागे व्हा , स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहायला शिका .
रोजगाराकडे पहा , उद्योग धंदे करा , नौकरीच्या मागे लागा ..
प्रसंगी बूट पॉलिश करा पण ह्या नेत्यांच्या बंगल्यावरची धूळ चाटण बंद करा ..
तुम्ही त्यांच्या मागे फिरणे बंद करा , बघा कसे रूप बदलतील
जगा फक्त तुमच्या आई-बापा साठी, समाजासाठी, आणि स्वत: साठी. 
rups.515@gmail.com

बेरोजगारी - Unemployment

😷🚫
सध्याच्या काळातील सर्वात ज्वलंत आणि महत्वाचा विषय .
पण राज्यकारण्यांना याचं काहीच गांभीर्य नाही हे मोठं दुर्दैव आहे .
राज्यकर्त्यांचं सोडा , जी तरुणाई बेरोजगार आहे आणि ह्या ; " भाऊ , दादा , तात्या , शेठ , साहेब , मालक " ह्यांच्या मागेपुढे फिरते त्यांनासुद्धा या " बेरोजगारी " च काहीच गांभीर्य नाही .
( कमवण्याच्या वयामध्ये हेच तरुण कायम अश्या राजकारण्यांच्या मागे पुढे शेपूट हलवत फिरत असताना सर्रास दिसते )
मी नेहमी या टॉपिक वर बोलत / लिहीत असतो .
चौका चौकात ; कुठल्यातरी नेत्याचा फोटो - नाव असलेला टीशर्ट घालून तोंडातील पुड्यांची पिचकारी मारत बसलेले तरुण मी नेहमी पाहतो .
खूप भीषण परिस्थिती आहे हि .
२ वेळेस धाब्यावर हाडकं खायला मिळणे , पाहिजे त्याला सोमरस मिळणे , आणि स्वतःच्या बापाचा रोड असल्यासारखं वाकडंतिकडं होत मोटरसायकल चालवण्यासाठी त्यात भरायला २ - ४ लिटर पेट्रोल मिळणे . यातच हे तरुण धन्यता मानतात .
या तरुणांना हे सुद्धा समजत नाही , कि तुमच्यासारखे भंपक हिरो ह्या नेत्यांना पुष्कळ मिळतात . पण तुमच्या परिवाराला तुम्हीच असता फक्त .
घरात २ वेळेसच्या जेवणाची भ्रांत असते , आई बाप घर चालवण्यासाठी अतोनात काबाडकष्ट करत असतात ; आणि चौकात बसून हा " हिरो " कुठल्यातरी नेत्याच्या तळव्यांची धूळ चाटत असतो .
" दादा - भाऊ - शेठ - मालक " असा गजरच चालवत असतो .
स्वतःच्या आई बापाला २ शब्द नीट बोलणार नाही , ना कुठलं घरातलं काम करणार . पण ह्या नेत्यांच्या बुटाला सुद्धा पॉलिश करून देणार .
आरे आपला बाप सुद्धा ' हाडा - मासाचा ' माणूसच आहे .
एका विशिष्ट वयानंतर त्याच शरीर सुद्धा थकून जातं .
कुठंतरी आपल्या सारख्या तरुणांकडून घराला हातभार लागेल अशी भोळी अपेक्षा ठेवून एक एक दिवस मागे सारला जातो .
ज्या वयात तरुणाईने " रोजगार - काम धंदा - उद्योग - व्यवसाय - नौकरी " यांसारख्या विषयाकडे लक्ष दिले पाहिजे , त्याउलट हीच तरुणाई ह्या नेत्यांच्या वाढदिवसाला बॅनर वर आपला फोटो लावण्यासाठी धडपड करीत असते .
हे अगदी भयावह आणि विदारक चित्र सध्या सगळीकडे दिसत आहे .
उद्याचा विचार करा , तुमच्या डोक्यात विचार पण येणार नाही त्यापेक्षा जास्त वेगाने जग पुढे जातंय .
ह्या जगात टिकण्यासाठी स्वतःला सिद्ध करा . ह्या नेत्यांच्या मागे पुढे गोंडा घोळण्यासाठी तुम्हाला जन्माला घातलंय का , तुमच्या आई बापाने ?
आज सरकारी नौकरी चा ग्राफ , दिवसेंदिवस उतरतच जातोय . साध्या शिपायाच्या ५० जागेसाठी ( माफी असावी , शिपाई ची नौकरी मिळणं पण मुश्किल आहे ) ५०००० फॉर्म्स येतायत . त्यात पदवीधर , पीएचडी होल्डर्स , उच्च पदवीधर , उच्च शिक्षित ...यांचीच संख्या जास्त असते .
मग आपल्याकडे तर फक्त साहेबांच्या बंगल्यावरची चाकरी , बस्स एवढाच अनुभव/पदवी आहे . याचा कुठच उपयोग होत नाही . आणि तुम्ही गेलात तरी बंगल्यावर #दुसरा_डॉबरमॅनयेतोच .
खाजगी कंपन्यांमध्ये अगदी ८ - १० हजारावर गुरासारखं राबताना कित्येक जणांना मी पाहिलंय .
वेळेवरच सर्व तरुणांनी सावध व्हावे . ह्या साहेबांच्या बंगल्यावर हेलपाटे घालण्यापेक्षा रोजगारासाठी धडपड करा . आई बापाच्या कष्टाला हातभार लावा .
एक किस्सा सांगतो ,
" माझ्या ओळखीच्या घरातील काकू एकेदिवशी मला बोलल्या , आमच्या ****** ला नौकरी बघ ना कुठंतरी . दिवसभर हुंदडत फिरत असतो त्या ***** च्या मागे . २९ वर्ष वय आहे याच आता , लग्नाला आलाय . ह्याच्या बापाला मोलमजुरी करून दिवसाला २०० - ३०० रु. आणि मला धुनी भांडी करून महिन्याचे ३००० - ४००० रु. मिळतात .
मी त्या ****** ला बोललो , अरे त्या भाऊंचा उदो उदो करण्यापेक्षा काम धंद्याचं बघ . तर खट्याळ हसून , तुम्हालाच काही अडत असेल तर सांगा ; भाऊंकडे शब्द टाकतो असं बोलून मला निरुत्तर केलं त्याने .
काय समजायचं ते मी समजलो , आणि विषय सोडून दिला . पण बरोबर ३ महिन्याने तोच ****** माझ्याकडे आला आणि रडायला लागला . बोलला , तुमच्या कंपनीमध्ये किंवा ओळखींमध्ये काम / नौकरी बघा ना माझ्यासाठी . त्या ****** ने म्हणे त्यांचं एक काम नाही केलं तर कुत्र्यासारखा चोपला याला आणि अगदी घालून पाडून बोलला " ......
असो , अस नको व्हायला . लवकर सावध व्हा .
#बेरोजगार_भत्ता मिळण्याची वाट बघत बसू नका .
स्वाभिमानाने काम करा .
नाहीतर , उद्याचा येणार भयानक दिवस तुम्हाला गिळंकृत करायला टपून बसलेलाच आहे .
आपल्या भारत देशातील तरुणाईचा डेटा खालीप्रमाणे आहे -
" India has more than 50% of its population below the age of 25.
More than 65% below the age of 35.
It is expected that, in 2020, the averageage of an Indian will be 29 years ."
( भारतात संपूर्ण लोकसंख्येच्या जवळपास ५० % हे २५ वर्ष वयोगटातील आहेत . ६५% पेक्षा जास्त लोकसंख्या हि ३५ वर्ष वयोगटातील किंवा त्यापेक्षा कमी गटातील आहे . २०२० मध्ये भारतातील लोकसंख्येचं सरासरी वयोमान हे २९ वर्ष असण्याची दाट शक्यता आहे )
म्हणजे आपण जेवढ्या लवकरात लवकर कमवायला लागू किंवा रोजगार करू लागू , तेव्हड आपलं भविष्य आपण सक्षम करू .
तरुणाईने ह्या असल्या नेतेमंडळींच्या मागे पुढे न फिरता आपल्या स्वतःच्या व आपल्या परिवाराच्या भविष्याविषयी चिंतीत व्हावे . त्यावर लक्ष द्यावे .
आज ग्रामीण भागात ३० - ३५ वर्षातील कित्येक तरुण अविवाहित आहेत . रोजगारच नाही , कमाईचा मार्गच नाही . मग लग्न तरी कस होईल . ह्या वाढत्या बेरोजगारीमुळे समाजात वाईट प्रवृत्तींना उधाण आलंय . गुन्हेगारी वाढतेय . पर्यायाने ह्या राज्यकारण्यांचा हेतू साध्य होतोय . आपला नाही 😡
__/\__
 

rups.515@gmail.com

तान-टेंशन-depression

😥😑🤐
सध्याच्या #so_called फास्ट जीवनातला सर्रास वापरला जाणारा "शब्द" . या शब्दाला उच्चारण्यासाठी वयाची कुठलीही अट लागत नाही . अगदी ४ - ५ वी मधलं पोरग बी म्हणतंय ; " लै टेंशन आलंय मला " . कशाचं , तर अभ्यासाचं .
म्हणजे या " #टेंशन_तान " ची झळ कुठपर्यंत आहे याचा विचार करण्याची गरज आहे आता .
शालेय जीवनात अभ्यासाचं " #टेंशन " .
होमवर्क नाही केला तर उद्या शिक्षक काय म्हणतील / काय करतील याच " #टेंशन " .
१० वी , १२ वी च्या रिझल्ट नंतर , कमी मार्क्स पडले आणि आता घरचे काय म्हणतील या " #टेंशन " मुळे कित्येक आत्महत्या होतात . याचा आकडा वर्षोनुवर्षे वाढतच जातोय . आता तर रिझल्ट लागायच्या आधीच , ' काय रिझल्ट लागेल / किती मार्क्स मिळतील ' या " #टेंशन " मुळे पण आत्महत्या होतायत .
इथला हा " #तान_टेंशन "
मार्क्स मिळवल्यानंतर हव्या त्या कॉलेज / इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश मिळेल का , याच परत " #टेंशन " .
मिळालंच , तर त्या नवीन वातावरणात टिकून राहण्याचं वेगळं " #टेंशन " .
दिवसेंदिवस हे " #टेंशन_तान " वाढतच जातं . कमी कधीच होत नाही . कॉलेज मध्ये असणाऱ्या भरमसाट ' अभ्यास , नोट्स , प्रोग्राम्स , प्रोजेक्ट्स ' या सर्वाना पार करत " Exam " च " #टेंशन " . प्रत्येक सेमिस्टर ला वाढत जाणारं " #टेंशन " .
लहान असताना आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट कायम सांगण्यात येते -
' फक्त १० वी पर्यंत मन लावून अभ्यास करा त्यानंतर काहीच टेंशन नसतं . लगेच १२ वी येते . तेव्हा , फक्त १२ वी पर्यंतच टेंशन असतं रे , परत सगळं निवांत असतं . कशीबशी १२ वी होते , तर आता तुज्या आयुष्याला नवीन वळण मिळणार आहे , so मन लावून अभ्यास कर .'
असं बोलणं प्रत्येकाने अनुभवलेलं असत . .. 🛐
असो ....!!!
कॉलेज मध्ये सगळ्या गतिरोधकांना पार करून परीक्षा देण्याचा टाइम येतो . तिथे तर सगळ्यात भयंकर " #टेंशन ". परीक्षा होते , रिझल्ट च्या वेळेस किती ' बॅक ' राहिले याचं " #टेंशन " .
त्या " #टेंशन " मधून पार पडलो की सर्वात मोठं " #टेंशन " येतं ; " नौकरी / जॉब " .
हा " #तान " कधीच कमी होत नाही , किंबहुना कधीच कमी होणार नसतो .
नौकरी तरी कुठे धड मिळते . सध्याच्या परिस्थितीत १०० जागा असतील तर ४०००० - ५०००० फॉर्म्स असतात . मग तिथल्या परीक्षेचं " #टेंशन " .
एवढ्या सगळ्यांमधून माझा नंबर लागेल का नाही या " टेंशन " मुले कितीतरी जीव जातायत .
बेरोजगारीचा " #तान " सर्वात गंभीर विषय आहे . या बेरोजगारीच्या
" #टेंशन " मधून आज शेकडो आत्महत्या होतायत .
सरकारी नौकरी मध्ये जाण्यासाठी हि भली मोठी आणि अशक्य अशी स्पर्धा पाहता , खाजगी कंपन्यांमध्ये गर्दी वाढतेय .
त्याचा फायदा हे खाजगी कंपन्यांवाले अगदी मनसोक्त घेतात . त्यांना माहित असतं आपण या एम्प्लॉई ला कसाही त्रास दिला तरी नौकरी जाण्याच्या भीतीने आणि पुढच्या " #टेंशन " मुळे हे एम्प्लॉई काहीही वाकडं करू शकणार नाहीत .
खाजगी कंपन्यांमधील असणारा " #तान " मी स्वतः अनुभवलाय .
शिफ्ट ८ तासांची असूनसुद्धा जबरदस्तीने १२ - १४ काम करवून घेतलं जातं . पगार पण तुटपुंजा . या पगारामध्ये स्वतःच भागवायच का गावाकडे घरी असलेल्या म्हाताऱ्या आईबापाकडे लक्ष द्यायचं ह्या " #टेंशन " मुले अनेक तरुण नाईलाजाने वेगवेळ्या वाईट मार्गाला लागलेले मी पाहिलेत . आणि अश्या वेळेस जाणूनबुजून टोचून बोलणारे
" नातेवाईक - पाहुणे मंडळी - मित्र कपंनी " यामुळे तर " #टेंशन " आजून वाढतं .
अगदी मरमर करून काम केल्यानंतर सुद्धा ' वरिष्ठ - मॅनेजर - बॉस ' यांच्याकडून अगदी हिन वागणूक / शिव्या / असभ्य वागणूक मिळते . तेव्हा तर भयंकर " #टेंशन " येतं . त्यातुन काही वेळेस नको तो मार्ग नाइलाजाने वापरावा लागतो .
आपण काही स्पष्टीकरण द्यायला गेलो आणि वरिष्ठांचा / मॅनेजर चा #इगो दुखावला तर विनाकारण आपला जॉब जाईल .
दुसरीकडे जॉब मिळेल का नाही याच परत #टेंशन.
बॅचलर लाईफ मध्ये खूप जास्त फरक कदाचित पडत नाही . परंतु , लग्न झालेल्याला वरिष्ठाचा इगो सांभाळत चूक नसतानाही शिव्या / असभ्य वर्तणूक / राजकारण सहन करावंच लागत .
नाहीतर नौकरी जाण्याचं #टेंशन.
अचानक नौकरी गेली तर घर कसं चालवायचं याच #टेंशन .
या #टेंशन मुळे तरुणाईमध्ये "depression च " प्रमाण खूप वाढत आहे .
त्यामुळे विनाकारण घरोघरी होणारी भांडणे / कुरबुरी यांचं वेगळंच टेंशन
नौकरी मधील राजकारणाचा नाहक बळी कित्येक तरुण आज होतात . ' आपली खुर्ची जात असेल तर खालच्याचा बळी द्या , भले त्याची काही चुकही नसेल ' - याचा वापर तर पुरेपूर केला जातो .
आजच्या फास्ट जगामध्ये " #तान_टेंशन " यावर काहीतरी उपाय करणे खूप अनिवार्य / गरजेचं आहे .
नाहीतर ; " #मी_खुप_टेंशन_मध्ये_होतो_म्हणून_माज्याकडून_हे_झालं " .....हे खुप वाढेल .😢😢😢😢😢😢
तान मुक्त जीवन जगा , भले २ पैसे कमी कमवा .
जीव महत्वाचा आहे .
तुमच्यावर खुपजण आवलंबून असू शकतात. 
#जीवन_व्यर्थ_घालु_नका 👍
rups.515@gmail.com

जात - धर्म ....!!!

#cast_religion
🕌🕋🏫📿🕉
भाऊ तुज आडनाव काय ? मी बोललो ****** , का ओ असं का विचारलंत ? नाही ****** म्हणजे तुम्ही *** जातीचे ना ? 
मला समजलंच नाही क्षणभर . मग क्लिक झालं .
जरा फ्लॅशबॅक मध्ये जातो .
लहानपणी शाळेत एकत्र डब्बा खाताना ; पाहिजे त्याच्या डब्ब्यात हाथ घालायचो . त्यात कधीच "भगवा - हिरवा - निळा - पिवळा" रंग दिसला नव्हता .
एकाकडे वाटाण्याची झणझणीत उसळ असायची , कोणाकडे ठरलेलीच बटाट्याची भाजी तर शेपू - मेथी एकाच्या डब्ब्यात असायची . शाळेतल्या मैदानात एक हाथगाडा वजा " फूड मॉल " असायचा . तिथले भडंग खाताना कधीच त्याचा कलर नाही पहिला .
खेळायचो एकत्र , बागडायचो एकत्र पण कधीच जातपात पडताळत बसण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो .
#जात_बघून_मैत्री_करण्याची_दळभद्री_शिकवण_कधीच_आपल्या_घरातून_मिळत_नव्हती_आणि_नाही 😡
मग आज हे विष कोण पेरतंय ? का आज जातीवरून हिणवलं जातंय ? तेच एकत्र डब्बा खाणारे आज रंगाच्या आणि आडनावाच्या भेदाभेदीत का तोलतायत एकमेकांना ? 😡
साधा प्रश्न , समजा आपण आजारी पडलो किंवा आपल्या जवळच कोणी आजारी पडलं आणि इमर्जन्सी मध्ये दवाखान्यात जावं लागलं ; तर डॉक्टर ची जात - धर्म पाहणार आणि मग ट्रीटमेंट घ्यायची का नाही असं ठरवणार का आपण ? मग इतर वेळेसच का ?😢
आपल्याला जाती धर्माच्या नावाने भांडवत त्यावर राजकारण केलं जात . हे साधं गणित आपल्याला कधी समजणार .
जातींवरून समाजसुधारकांना आणि महापुरुषांना पण वाटून घेतलंय आपण किंबहुना आपल्याकडून करवून घेतलं जातंय .
यांसारख्या गोष्टींवरती तर सगळं राजकारण शिजत .
आज सगळ्या जाती धर्मातील बेरोजगारांनी आपल्याला रोजगार कसा मिळवता येईल यांसारख्या विषयावर एकत्र येणं गरजेचे आहे . पण आपण एकत्र कशासाठी येतो ; तर दुसऱ्या जातीला किंवा धर्माला खाली कस पाडता येईल आणि त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजता येईल अश्या दरिद्री मानसुब्याला मदत करण्यासाठी . हेच सर्वात मोठं दुर्दैव आहे आपलं .
एकदा फक्त सगळेजण एकत्र या ; जात धर्म सोडून एकत्र येऊ ..हेच राजकारण करणारे शेपूट गुंडाळून बसतील .
ज्याच्या डब्यातील जेवणाला भारी टेस्ट असायची आज त्याची टेस्ट आपण आडनाव किंवा जात पडताळून करतोय . खूप खाली जातोय आपण .
अगदी रसातळाला जाऊ ; अश्याच वागण्याने . 
सर्वात प्रथम बेरोजगारी नष्ट करण्याकरता सर्वानी एकत्र येणे आणि आपल्या उदरनिर्वाहाची सोय करणे हि काळाची आणि कळकळीची गरज आहे . _/\_
✍ 
rups.515@gmail.com

पावसाळा - Rainy

३ मुख्य ऋतूंपैकी एक . अत्यंत सुखद असा ऋतू . अंगाची लाही लाही करून टाकणाऱ्या उन्हाळ्यात ह्या सुखद ऋतूची खूप जास्त आठवण होते . घामापेक्षा , थंड पावसाच्या थेंबाने कधिएकदा अंग भिजेल ह्याची आतुरता जास्तच होते .
रुक्ष अश्या वातावरणातून मस्त हिरवळीत जाण्याची ओढ जास्त सुखद असते . मस्त हिरवळ , डोंगरकपारीतून झुळूझुळू वाहणार पाणी , हवेतील हवाहवासा असलेला गारवा ; हे सगळं खूप म्हणजे खूपच सुखद असत . 
पण ,
आजची परिस्थिती अशी आहे कि प्रत्येक ऋतू हा " #अति " होतोय . पाऊस यावा म्हणून विविध प्रकारचे तोटकेही वापरले जातात . आला आला म्हणत , कधी थांबशील रे पावसा असं म्हणण्याची वेळ येतेय (काही प्रदेशामध्ये) .
काही ठिकाणी तर १ - २ पावसातच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते , रस्ते खचतात , घर पाण्यात जातं , माणसं वाहून जातात , गाड्या वाहून जातात , ढगफुटी होण्याचं प्रमाण मागील काही वर्षात वाढलंय (माळीण गावचं उदाहरण विसरू शकत नाही) .
मुंबई मध्ये तर १ - २ पावसात रस्ते पाण्याखाली जातात . कुठे गुडघाभर कुठे गळ्यापर्यंत पाणी साचत .
जुन्या लोकांना विचारलं तर , आमच्यावेळेस हे अस होत नव्हतं हे उत्तर मिळत . मग आताच का अस होतंय ? याचा कधी कोणी विचार केलाय का ?
पाणी निचरा व्हायला जमीनच नाहीये , सगळीकडे सिमेंटचे जाळे पसरले आहे .कस काय पाणी मुरेल . नाल्या तुंबलेल्या असतात . प्रशासनाला तरी कुठपर्यंत दोष देत बसणार आपण . आपली पण नागरिक या नात्याने जबाबदारी आहेच कि . कचऱ्यावर नियंत्रण आणि त्याच वर्गीकरण हे एवढंसं केलं प्रत्येकाने तरी बराच फरक पडेल . असो
मूळ मुद्दा म्हणजे जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार आधी असं होत नव्हतं ...मग आपल्याच नशिबी का ?
माणूस जेव्हडा निसर्गाशी खेळेल , जेव्हडी निसर्गाची हानी करेल ; निसर्गाचा कोप हा असाच होत राहणार . योग्य वेळीच आपण निसर्गाची काळजी घेऊन निसर्ग संगोपन घेऊया . वृक्ष तोड एवढ्या मोठ्या प्रमाणात चालूय , निसर्गाशी घेतोय आपण पंगा म्हणून निसर्ग असा घालतोय दंगा . (आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे) .
उष्माघाताने जीवितहानी , पुरात वाहून जीवितहानी & वित्तहानी हा निसर्गाचा कोप नाही तर दुसरं काय आहे .
अजूनही आपण यातून सावरू शकतो .
वृक्ष लागवड , त्यांचं संगोपन , पावसाच्या पाण्याचं योग्य पद्धतीने साठवण ; अश्या गोष्टींमुळे निसर्गाचा समतोल राखण्यास नक्कीच मदत होईल .
प्रत्येक वर्षी प्रत्येक ऋतूतील होणारा हाहाकार आपण पाहतोच , ऐकतोच . यावर लवकरात लवकर उपाय करणे खूप गरजेचं आहे . 

रविवार - Sunday

( संडे-इतवार )
रविवार म्हणजे लहापणीचा सर्वात पर्वणीचा दिवस .
लहानांपासून थोरांपर्यंत .
उद्या रविवार म्हटल्यावर शनिवारी जरा उशिराच झोपायचो .रात्रौ ०९:३० ची "जय हनुमान" मालिका बघून मग शनिवार स्पेशल म्हणून हिंदी पिक्चर लागायचा .
रविवारची सुरुवातच व्हायची मस्त #रंगोली या गाजलेल्या गाण्यांच्या मालिके पासून . आधी ड्रीम गर्ल #हेमा_मालिनी
होस्ट करायच्या . मग कालांतराने , #प्राची_शाह" होस्ट करायला लागल्या .सुमधुर गाण्यांनी रविवारची सुरुवात व्हायची .
रविवार म्हणजे दिवसभर TV चालूच असायचा #दूरदर्शन . एकच चॅनेल असायचं तेव्हा .
#रंगोली झाल्यानंतर सकाळी ०९:०० वाजता लागायचं #श्री_कृष्णा .
वा , काय मालिका होती . म्हातारे कोतारे तर हातात फुलं घेऊन मालिका पाहायचे . कंसमामाच्या नावाने कडाकडा बोट मोडणाऱ्या म्हाताऱ्या मी पाहिल्यात लहानपणी .
मग , आमचं जेवण व्हायचं . रविवारचा काहीनाकाही बेत असायचाच .
मग नंतर #जुनियर_जी , #आर्यमान , #शकलाका_बूम_बूम अश्या मालिकांनी आमचं बालपण अजूनच मजेदार बनवलं .
नंतर दुपारी १२:०० वाजता यायचा भारतातील पहिला वहिला सुपरस्टार #शक्तिमान .
या मालिकेने तर आमच्या जनरेशन वर अक्षरशः भुरळ घातली होती .
विद्याधर मायाधर गंगाधर ओंकारनाथ शास्त्री हा इंट्रो देऊन हीही करून हसत दुसऱ्या रूपातील #शक्तिमान यायचा . काही संकट आलं , कि हळूच कल्टी मारून फुकफूक करून आवाज यायचा आणि पिवळ्या सोनेरी पट्ट्या असलेली लालसर मानवाकृती हवेत उडायची . कि लगेच आमच्या टाळ्या शिट्ट्या वाजायच्या . आता काय खरं नाय दुष्मनाच आम्हीच छाती फुगवून बोलायचो .
अंधेरा कायम रहे म्हणत काळसर हुडीज मधला #सम्राट_किलविष जबराट च होता .#डॉकटर_जयकोल - पावर्रर्रर्र म्हणला कि कायतरी नवीन संकट येणार हे फिक्स असायचं.
●●(वाचणार्यांपैकी किमान ८५% लोकांनी तरी शक्तिमान चा ड्रेस घेतला होता किंवा घेण्यासाठी घरात हट्ट केला होता) ●●
मग दुपारी लागायचं #छायागीत . त्याकाळातील नवीन गाणे छायागीत वर दाखवायचे .
नंतर च्या वेळी बरेच कार्यक्रम येऊन गेले . RK फिल्म्स पण इंस्टालमेंट्स मध्ये दाखवल्या जायच्या 
मग दुपारी ४ वाजता , मराठी पिक्चर यायचा .
आम्ही सुरवातीची नाव बघायचो . #लक्ष्या - #अशोक_सराफ यांची नावं असतील तर पिक्चर बघायचो .
नाही तर बॅट - बॉल घेऊन निघालो गल्ली क्रिकेटला .
संध्याकाळी घरी आलो कि , मस्त "लॉरेल & हार्डी" यायचे आणि पोट धरून हसवायचे .
मग , यायच्या जबरदस्त धून असलेल्या ०७:०० च्या ठळक बातम्या .
"नमस्कार,आजच्या ठळक बातम्या" अशी सुरुवात व्हायची .
ते झालं कि भीमसेन जोशी & टीम यांचं #मिले_सूर_मेरा_तुम्हारा" हे अप्रतिम गाणं यायचं .आजही त्याची धून , लय पाठ आहे .
रात्री जेवताना #चंद्रकांता" लागायचं . त्यातला तो #क्रूरसिंग - यक्कु म्हणत काय तरी करायचा के लगेच धूर व्हायचा .
मग नंतरच्या काळात रात्री हिंदी फिल्म्स चालू झालेल्या . ते पाहायचो आणि सोमवारसाठीचं दप्तर आवरून झोपी जायचो .
#पुढच्या_रविवारची_वाट_पाहत_डोळे_मिटायचे 🙂😊
आताच्या जनरेशन ला एका हातात रिमोट , त्यावर २५० - ३०० वेगळे वेगळे चॅनल्स . एका हातात मोबाईल , त्यावर तर हवं ते मिळत .
जाग्यावर बसून जगाची सफर होते .
पण या पिढीला , गच्चीवर जाऊन अँटिना वाकडा तिकडं फिरवून "#दिसतंय_का_रे" असा बोम्बलण्याची मजा नाही कळणार .
जाग्यावरून रिमोट ची बटणं दाबत चॅनेल बदलताना , मुंग्या आल्यावर TV ला फटका मारून मुंग्या घालविण्याची कला नाही समजणार . 

rups.515@gmail.com